दानाला फक्त अर्थ नसतो तर परमार्थ देखील असतो. खरतर, आपल्यात दान देण्याची कुवत निर्माण होणं हे कुठल्या वरदानापेक्षा कमी नसतं. एका सामान्य घरातला मुलगा ते आज प्रतिथयश उद्योजक असा संघर्षमय प्रवास केलेल्या नाशिक स्थित डॉ श्री किरण बडगुजर यांनी हे जाणलं आणि समाजातल्या गरजूंना आधार देण्यासाठी ‘आदित्यम फाउंडेशन-किरण आशेचा’ ही सेवाभावी संस्था 2012 साली स्थापन केली. समाजातला कुठलाही एक विशिष्ट घटक केंद्रस्थानी न ठेवता जिथे गरज तिथे आम्ही हा संस्थेच्या काम करण्याचा दृष्टीकोण राहिलाय. आदित्यमचा अर्थ सूर्य असा होतो आणि दान हे देखील सूर्यासारख असतं… जिथे केलं जातं तिथली प्रत्येक गोष्ट ते उजळून टाकतं.
आदित्यम फाउंडेशनच्या कार्याचा प्रकाश सुद्धा असा अनेक ठिकाणी पसरलाय. असं म्हणतात की घरातल्या करत्या माणसाचं आयुष्य सावरलं की घरातल्या सगळ्याच माणसांचं आयुष्य सावरलं जातं. संस्थेने पुढाकार घेतल्याने अनेक व्यसनाधीन व्यक्तींची आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबियांची आयुष्य देखील सावरली आहेत. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी स्वतः मात्र कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय हे पाहून देवावर आणि माणुसकीवर नितांत श्रद्धा असणार्या बडगुजरांनी अशा अनेक शेतकर्यांना खते, बियाणे, जनावरांना लागणारी औषधे, त्यांची खादये यांचे स्वतःची पदरमोड करून मोफत वाटप केले आहे. दान म्हणजे फक्त देणं नसतं तर दानाचा अर्थ बदल घडवणे हा देखील असतो हे सूत्र संस्थेने काटेकोरपणे पाळलेले आहे. असाच बदल अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन संस्थेने घडवून आणलाय. चांगले शिक्षण घेऊन देशाचे भविष्य ठरणारी ही पिढी आदित्यम फाउंडेशनचं उदाहरण समोर ठेऊन स्वतः देखील समाजातल्या दुर्बल घटकांना पुढे आणण्याचं काम करेल हे नक्की. आणखी किती क्षेत्रात संस्थेने आपलं कार्य केलय याचा ऊहापोह करायचा म्हंटला तर ते फार मोठं काम होईल.
आपण प्रत्येकाला मदत करू शकत नाही पण प्रत्येकजण कुणालातरी मदत नक्की करू शकतो. म्हणूनच आदित्यम फाउंडेशनला आपल्या सामाजिक कार्याचं रूपांतर आता सामाजिक चळवळीत करायचं आहे. आमची इच्छा आहे की समविचारी दानशूर व्यक्तींनी आमच्या सोबतीला यावं. सामाजिक भान जपणार्यांसाठी पुण्य कमवण्याचा मार्ग जास्त प्रशस्त असतो. हा मार्ग आपण मिळून तयार करू. आपली संस्था नोंदणीकृत असल्याने आपल्याला आयकर परताव्यातही सूट मिळू शकते. खाली दिलेल्या ईमेल वर किंवा मोबाईल क्रमांकावर आपण आमच्याशी जरूर संपर्क करावा. धन्यवाद.